माझ्या आईचा आवाज छान आहे. ती गोंदावलेकर महाराजांच्या आरत्या, भजनं, माझे आजोबा (आईचे बाबा) ती लहान असताना म्हणत असलेले अभंग वैगरे ती खुप छान म्हणते. ती माझ्या भावाला किंवा बहिणीला मांडीवर झोपवताना यातलं काही काही म्हणत असे. ती सगळीचं भजनं, गाणी, अभंग मला फार आवडतात. त्या मध्ये 'निंदकाच्या तोंडी साबणाची वडी' हे मला खुप जास्त आवडतं. लहान असताना शब्दाचा अर्थ समजायचा नाही, त्याची चाल आवडायची, आणि 'निंदकाच्या तोंडी साबणाची वडी' असं म्हटल्यावर मला वाटायचं कि खरंच साबण निंदकाच्या तोंडात घालतात कि काय? मग त्या निंदकाला कशी चव लागत असेल त्या साबणाची. मग तो साबण कसा चाऊन चाऊन खाईल, मग चावताना त्याच्या तोंडून कसा फेस बाहेर पडेल. निंदा करणारा तो निंदक एवढं माहिती होतं, माझ्या बद्दल कोणी आईकडे तक्रार केली असेल ते सगळे माझे निंदक. मी काही फार दंगा करणार्यातली नाही त्यामुळे माझ्याबाबतीतली main तक्रार म्हणजे भाज्या खात नाही. मग ऍकता ऍकता मी imagin करायचे कि माझे latest निंदक (शाळेतल्या बाई, नातेवाइक) यांच्या तोंडामधुन साबण खाता खाता फेस येत आहे. मग मला खुप आनंद व्हायचा कशी शिक्षा मिळाली.
आता मला या अभंगाच अर्थ समजतो आहे.
निंदकाच्या तोंडी साबणाची वडी,
जीवन पासोडी शुद्ध केली, जीवन पासोडी शुद्ध केली
ठायीच बैसोनी करा एक चित्त
आवडी आनंत आळवावा, आवडी आनंत आळवावा
न लगे सायास जावे वनांतरा
सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण
नको नको मना गुंतू मायाजाळी
काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया
काळाची बा उडी पडेल बा जेव्हा
सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना तेव्हा मायबाप
सोडविना बंधु सोडविना भगिनी
शेजेची कामिनी दूर राही, शेजेची कामिनी दूर राही
तुका म्हणे तुज सोडविना कोणी
एक चक्रपाणि वाचुनिया, एक चक्रपाणि वाचुनिया
सध्या साहित्य संमेलन, आनंद यादव, वारकरी संप्रदाय यांच्या कृपेमुळे तुकाराम महाराजांचे काही अभंग माझ्या वाचनात आले. किती सहज सोप्या शब्दात त्यांनी किती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता या वर्षभरात जसं जमेल तसे तुकाराम महाराजांचे अभंग वाचावे म्हणतेय.
अशीच अजुन एक इच्छा आहे. ती म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या कवितांचं पुस्तक वाचायचं आहे. बघु कधी वेळ मिळतो.
Tuesday, March 24, 2009
Subscribe to:
Posts (Atom)