Friday, October 23, 2009

गाणं

खाणं आणि गाणं या दोन गोष्टी मला फार, फार, फार आवडतात. गाण्याचे कार्यक्रम ऐकायला मला खुप आवडायचं. आज काल वाटतं की या गाण्याच्या कार्यक्रमांची अती परिचयात अवद्न्या झाली आहे. इचलकरंजी ला असतना गणपतीत, दिवाळी पाडव्याला वैगरे असे कार्यक्रम व्हायचे. आता पण होतात. स्थानिक कलाकार हे कार्यक्रम करतात. अशा कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे असतात. जर हा सूत्रसंचालक चांगला असेल तर कार्यक्रम एकदम सहीही.. होतो. माझ्या सारख्यां लोकाना गाणं समजुन घेण्यासाठी अशा सूत्रसंचालकांची खूप मदत होते. माझ्या सारखे लोक म्हणजे त्याना गाणं आवडतं पण त्यातलं exactly काय आवडतं हे समजत नाही, म्हणजे मला जुनी गाणी आवडतात, मला A. R. Rehman ची गाणी आवडतात, मराठी मध्ये सुधीर फडकेंची गाणी आवडतात, अर्थपुर्ण गाणी आवडतात. पण problem हा आहे कि काही गाण्यांचा अर्थच कळत नाही. मग कोणी हे गाणं जरा समजावून सांगीतलं की ते गाणं खुप आवडतं.
मला आठवतं, मी एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. इचलकरंजीच्याच एका ग्रुप चा कार्यक्रम होता. कार्यक्रम एकदम रंगात आला होता. एक गाणं संपलं सूत्रसंचालकांनी कार्यक्रम पुढे सुरु केला.(मला जसं आठवतं तसं मी सांगायचा प्रयत्न करते.)
"सुधीर फडकेंचं HMV बरोबर असणरं contract संपत आलं होतं. दोन गाणी राहिली होती. त्यांना ती दोन गाणी खुप छान करायची होती. त्यांनी शान्ता शेळकेंना गाणं लिहिण्याची विनंती केली. त्या गाण्याची situation अशी होती, आयुष्याच्या संध्याकाळी तो आणि ती एकमेकांना भेटली आहेत. तरूणपणी ते दोघे जिथे भेटत असत तिथेच ते भेटलेले आहेत. त्यावेळी सारखीच निरव शांतता आहे, तसंच चांदणं आहे, सगळं सगळं तसंच आहे, फक्त ते प्रेम नाही. त्या वेळी जी भावी आयुष्या बद्दल स्वप्न पाहात, ती आता डोळ्यात नाहीत, त्या हळव्या भावना नाहीत.
हे सांगितल्या नंतर गाणं सुरू झालं आणि अनेकवेळा ऐकलेलं गाणं, मी नव्याने ऐकलं


तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी

सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच तीच तूहि प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी

Tuesday, March 24, 2009

निंदकाच्या तोंडी साबणाची वडी

माझ्या आईचा आवाज छान आहे. ती गोंदावलेकर महाराजांच्या आरत्या, भजनं, माझे आजोबा (आईचे बाबा) ती लहान असताना म्हणत असलेले अभंग वैगरे ती खुप छान म्हणते. ती माझ्या भावाला किंवा बहिणीला मांडीवर झोपवताना यातलं काही काही म्हणत असे. ती सगळीचं भजनं, गाणी, अभंग मला फार आवडतात. त्या मध्ये 'निंदकाच्या तोंडी साबणाची वडी' हे मला खुप जास्त आवडतं. लहान असताना शब्दाचा अर्थ समजायचा नाही, त्याची चाल आवडायची, आणि 'निंदकाच्या तोंडी साबणाची वडी' असं म्हटल्यावर मला वाटायचं कि खरंच साबण निंदकाच्या तोंडात घालतात कि काय? मग त्या निंदकाला कशी चव लागत असेल त्या साबणाची. मग तो साबण कसा चाऊन चाऊन खाईल, मग चावताना त्याच्या तोंडून कसा फेस बाहेर पडेल. निंदा करणारा तो निंदक एवढं माहिती होतं, माझ्या बद्दल कोणी आईकडे तक्रार केली असेल ते सगळे माझे निंदक. मी काही फार दंगा करणार्‍यातली नाही त्यामुळे माझ्याबाबतीतली main तक्रार म्हणजे भाज्या खात नाही. मग ऍकता ऍकता मी imagin करायचे कि माझे latest निंदक (शाळेतल्या बाई, नातेवाइक) यांच्या तोंडामधुन साबण खाता खाता फेस येत आहे. मग मला खुप आनंद व्हायचा कशी शिक्षा मिळाली.
आता मला या अभंगाच अर्थ समजतो आहे.

निंदकाच्या तोंडी साबणाची वडी,
जीवन पासोडी शुद्ध केली, जीवन पासोडी शुद्ध केली

ठायीच बैसोनी करा एक चित्त
आवडी आनंत आळवावा, आवडी आनंत आळवावा

न लगे सायास जावे वनांतरा
सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण

नको नको मना गुंतू मायाजाळी
काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया

काळाची बा उडी पडेल बा जेव्हा
सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना तेव्हा मायबाप

सोडविना बंधु सोडविना भगिनी
शेजेची कामिनी दूर राही, शेजेची कामिनी दूर राही

तुका म्हणे तुज सोडविना कोणी
एक चक्रपाणि वाचुनिया, एक चक्रपाणि वाचुनिया

सध्या साहित्य संमेलन, आनंद यादव, वारकरी संप्रदाय यांच्या कृपेमुळे तुकाराम महाराजांचे काही अभंग माझ्या वाचनात आले. किती सहज सोप्या शब्दात त्यांनी किती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता या वर्षभरात जसं जमेल तसे तुकाराम महाराजांचे अभंग वाचावे म्हणतेय.
अशीच अजुन एक इच्छा आहे. ती म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या कवितांचं पुस्तक वाचायचं आहे. बघु कधी वेळ मिळतो.

Tuesday, February 24, 2009

Outsourced

काल कंपनीमध्ये आल्या आल्या म. टा. ची वेबसाईट ओपन केली आणि सुखद धक्का बसला (कारण आज oscar awards आहेत हि माहिती मज पामराला नव्हती). पहिली बातमी 'स्लमडॉग मिलेनियर' ला दोन ऑस्कर मिळाल्याची होती. नंतर ५ ऑस्कर मिळाल्याची बातमी आली, आणि शेवटि ८ ऑस्कर awards मिळाल्याचं वाचलं. ए. आर. रेहमान ला दोन awards. सही... ए. आर. रेहमान आणि गुलजार बेस्ट....

गेल्या शनिवारी असाच एक movie पाहिला 'Outsourced'. असाच म्हणजे movie Hollywood चा पण सगळं शुटिंग भारतामध्ये. छान आहे हा movie (म्हणजे मला आवडला, तुमचं मत वेगळं असू शकतं). भारतातील call center वर आहे movie.

Thursday, February 19, 2009

भित्री भागु

एक भित्री भागु आहे. ती खुप खुप घाबरते. भित्र्या भागुचं घर दोन मजली, पन लहान असताना, ती कधीही एकटी माडीवर गेली नाही(आता सुद्धा एकटी माडीवर जायला घाबरते). भितीदायक पिक्चर ती कधीही पहात नाही. भुतं खेतं, अंधार, माणसं, गाडीचा speed, रस्ता cross करणे, गाडी चालवणे या सर्वांची तिला खुप खुप भिती वाटते. रिक्षावाला जर व्यवस्थित वाटला तर ती रिक्षा करते, रिक्षात बसताना सुद्धा डाव्या बाजुला खेटुन बसते, हा विचार करुन, जर रिक्षा माहिती नसलेल्या रस्त्यावर घेतली तर उडी मारायला बरं. यासाठी ती शक्यतो PMT ने प्रवास करते आणि लोकाना वाटतं "काय कंजुस आहे हि". रस्ता cross करताना शक्यतो ती सिग्नल लागल्यावरच रस्ता cross करते. जर कुणी बरोबर असेल रस्ता cross करताना तर ती त्या व्यक्तीला गाड्या ज्या बाजुने येतात त्या बाजुला उभं करते (म्हणजे काय झालं तर त्याल होइल). ती कधीहि रात्री एकटी प्रवास करीत नाही. बहिण बरोबर असेल तरीसुद्धा तिला रात्रीच्या प्रवासात झोप लागत नाही.
हि भित्री भागु चार वर्षापुर्वी इचलकरंजीहून पुण्याला आली. ती आत्याकडे निगडीला रहात होती आणि तिचं ऑफिस होतं NDA कोंढवागेट ला. रोज ती निगडी ते बालगंधर्व आणि बालगंधर्व ते कोंढवागेट असा प्रवास करायची. एक दिवस ती ६.४० च्या निगडी-कात्रज बस मध्ये बसली, तिला बालगंधर्व ला उतरायचं होतं. पण त्या दिवशी तिला गाढ झोप लागली, इतकी गाढ की तिला जाग आली त्यावेळी बस डेक्कन कॉर्नर क्रॉस करत होती. NDA मध्ये लष्करी शिस्त, उशीर झाला तर व्यास सर रागावतील, हा विचार करीत ती तरातरा चालायला लागली. उजवीकडे वळाली, पुढे चालत जातेय जातेय तिला "पुना हॉस्पिटल" काहि दिसेना. पुना हॉस्पिटल कुठे गेलं म्हणुन ती इकडे तिकडे पाहु लागली, पहाते तर काय एकिकडे लिहिलंय "वैकुंठ स्मशानभुमी", दुसरीकडे "प्रेत पुरण्याची जागा" भित्र्या भागुची घाबरगुंडी उडाली. तिला आपण कुठे आलो हे समजेना, ७.३० ची वेळ, थंडीचे दिवस, रस्त्यावर कोणीहि नाही, तिच्या छातीत धडधडायला लागलं, घशाला कोरड पडली, जाम टेन्शन आलं. एक तर रस्ता माहिती नाही, कोणाला विचारावं तर रस्त्यावर चिटपाखरु नाही. श्री राम जय राम जय जय राम म्हणत ती पुढे चालु लागली. एवढ्यात पाठीमागून स्कुटर चा आवाज आला. वळून पाहाते तर एक काका badminton खेळून परत निघाले होते (पाठीला racket होती). लिफ्ट मागावी का? विचारू तरी भुतांपेक्षा माणसं बरी म्हणून तिने त्या काकांना विचारलं.
भिभा : हा रस्ता कुठे जातो
काका : कर्वेरोडला
भिभा : तुम्हि तिकडेच निघाला आहात का?
काका : हो
भिभा : मला corner पर्यंत लिफ्ट द्याल का?
काका : बसा
ती काकांच्या स्कूटर वर बसली आणि आयुर्वेद रसशाळेजवळ उतरली. पाहते तर, तिची नेहमीची बस (PMT) गरवारे कॉलेजच्या स्टॉप वरुन निघली होती. ती सुसाट पळत सुटली. कंडक्टर ने बस तिच्या समोर थांबवली. ती NDA मध्ये पोहोचली. तो दिवस तिच्या चांगलाच लक्षात राहिला.........

Wednesday, January 21, 2009

कंटाळा

जाम कंटाळा आला आहे. काहि काम नाही ऑफिस मध्ये. बरेच दिवस न वाचलेले ब्लॉग वाचून झाले, ई-मेल चेक करून झाले, मित्र मैत्रिणींना फोन केले, कंपनी च्या वेबसाईट वर असलेले डिस्कशनस वाचले, आता काय करायचं हा प्रश्न आहे. मग कंपनीच्या ई-मेल वरून Gmail च्या account वर एक email पाठवला, मग gmail चं account refresh केलं तिथे email receive झाल्यावर् त्या email ला gmail च्या account वरून reply केला हा अस खेळ बराच वेळ सुरू होता. आता काय करावं............

Saturday, August 30, 2008

तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस हि!!!!

कोऽहं च्या ब्लॉग वरचं भांडण वाचुन, मला हे आठवलं
अमृता : आज उशीर झाला?
मी : होय
अमृता : काय झालं मूड खराब आहे वाटतं?
मी : नाहि गं..
अमृता : ह्म्म..
मी : आधी ते गाणं बंद कर, थकुन घरी आल्यावर असली गाणी ऐकवू नको.
अमृता : का? मला आवडतं.
मी : काय तर गाणं, मला असली गद्य गाणी आवडत नाहित.
अमृता : मला आवडतात.
मी : मग मी कंपनी मध्ये गेल्यावर लाव!
अमृता : तुच जातेस का? मी नाहि का जात? मला पण office आहे.
मी : काय गाणं "मी कांदा झालो नाहि, आंबा हि झालो नाहि" , कसं गं तुला आवडतं?
अमृता : पसंद अपनी अपानी, खयाल अपना अपना. ताई पुढचं गाणं ऐक तुला पण खुप आवडेल.
मी : मी म्हटलं ना मला हि गाणी आवडत नाहित
अमृता : तु ना जुन्या जमान्यातली असल्या सारखी वागतीस बास झाले आता सुधीर फडके ऐकणं.
मी : यात जमाना कुठे आला? काहिहि बोलायच का? शब्द, चाल या मुळं मला त्यांची गाणी आवडतात. आल्या आल्या भांडु नको. या गाण्याला काहि अर्थ आहे का? तुच सांग.
अमृता : पुढचं गाणं ऐक त्यात तुला चाल, शब्द सगळं मिळेल, सरसकरट सगळ्याला नावं ठेउ नको.
मी : मी फ्रेश होउन येते, चालु दे तुमचं, ऐकु नको कधिहि.
.................
(ओ ओ हे गाणं ऐक म्हणत होती तर अमर.)
मी : ए ए हे कुठलं गाणं company मध्ये एका कलिग चा हा ring tone आहे.
अमृता : आता का?
मी : सांग ना, सांग ना...
अमृता : आता लाईट आल्यावर ऐक, छान गाणं आहे. "तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस हि"
मी : छान आहे!!!!!
अमृता : ऐकावं कधीतरी लहान बहिणीचं.

Wednesday, July 16, 2008

मालेगांव ची थिएटर्स

Disclaimer : पोस्ट पुर्णपणे ऍकिव माहितीवर आधारीत.

मी मालेगांव पाहिलं नाही. माझा एक सहकारी ( मला कलिग म्हणायच आहे) मालेगांव चा आहे. या आधीच्या कंपनी मध्ये तो आणि मी एका टिम मध्ये होतो. ती कंपनी हिंजवडी मध्ये असल्यामुळे आम्हाला अशा गप्पा मारायला cab मध्ये खुप वेळ मिळत असे. एकदा असाच मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स असा विषय निघाला आणि मालेगांव मध्ये थिएटर ला पिक्चर बघणे म्हणजे काय असतं हे त्यानं आम्हाला सांगितलं. चर्चा मल्टिप्लेक्स वरुन सुरु झाली. त्याच्याच शब्दात देण्याचा थोडा फार प्रयत्न.


"मालेगांव ला पिक्चर पहायचा म्हणजे एक मोठा एव्हेन्ट वाटायचा. कारण तिकिट काढण्यापासून trilling exp. ला सुरुवात. ती तिकिट खिडकी च्या समोरच्या जागेत (रांगेत जिथे सर्वात शेवटी जाळी असते ना तिथे) एक व्यक्ति आणि त्या तिकिट खिडकी च्या डाव्या बाजुने एक, आणि उजव्या बाजुने एक असे जाळी मधुन हात, आणि त्या जाळीवर चढुन तिकिट मागणारा एक हात. मग भांडणं होतात, मराठी आणि हिंदी भाषेतल्या शेलक्या शिव्या कानावर पडतात आणि मग तिकिट हातात पडतं. या नंतर तर मोठा गड सर करायचा तो म्हणजे जागा पकडायची. तिकिट घेऊन दरवाजा पर्यंत जाई पर्यंत तिथे गर्दि, आणि मग डोअरकिपर ग्रिल एक माणुस जाईल इतकं उघडतो. तिथे धक्काबुक्की (म्हणजे कधी कधी खरचं धक्का + बुक्की). मग तुम्ही कसे तरी थिएटर मध्ये शिरता. आत गेल्यानंतर तुम्हि रिकाम्या खुर्चीवर बसायला जाल, तर त्या रांगेच्या पहिल्या सीटवरून आवाज येइल "ए वहॉ मत बैठो, ये सब सीट पकडलीया है". रांगेच्या एका टोकाला तो माणुस आणि दुसर्‍या टोकाला चप्पल, रुमाल, टोपी तत्सम वस्तू तुम्हाला दिसेल. मग मुकाट्याने मागच्या रांगेत जाऊन बसलात कि समोरच्या रांगेतली व्यक्ति मोठ्याने आवाज देइल "ए रफिक, तौफिक इधर आव!!!!" अश्या तर्‍हेने सगळी स्थानापन्न होतात. थिएटर मध्ये काही समलमान खान चे fan शर्ट काढुन बसतात, संजय दत्त चे fan केस वाढवुन आलेले असतात. मग 'इस्माइल विडी' च्या निळ्या निळ्या धुरात आणि गुटख्या च्या वासामध्ये पिक्चर सुरु होतो. 'राज' मी असाच निळ्या निळ्या धुरात पाहिलाय, आधीच त्यात थोडा अंधार आहे. पिक्चर ला जाताना कायम रंगपंचमी ला खराब झालेले कपडे घालुन जायचो. पहिल्यांदा City Pride ला गेलो, आणि काय अरे बघतो तर लोक छान छान कपडे घालुन आलेले. आता पिक्चर सुरु झाला एखादा चांगला सीन असेल म्हणजे नाना पाटेकर नं नाना स्टाइल मध्ये एखादं भाषण ठोकलं तर थिएटर शिट्ट्यानी दणाणतं (City Pride ला टाळ्या पडतात). एखाद्या item song ला अजुनसुद्धा सुट्टे पैसे स्क्रिन वर फेकतात. काहि काहि थिएटर्स तर अशी आहेत, इंग्रजांच्या काळापासुनची जाळि आजहि तिथे लटकत आहेत."

थोड्या फार फरकानं माझ्या गावाला पण असच आहे.