Monday, April 14, 2008

मी फुल तृणातील इवले!!!

गुढी पाडव्याची सुट्टी असल्यामुळे घरी इचलकरंजी ला गेले होते. शुक्रवारी पोहोचले, आता शुक्रवार असल्यामुळे आई, बाबा ऑफिसला गेलेले, भाऊ कॉलेजला. त्यामुळे घरी मी, आज्जी आणि आजोबा. इचलकरंजी ला ६ तास भारनियमन आहे. त्यामुळे टिव्ही, कॉम्पुटर यांचा काहि उपयोग नाहि. मग मी आणि आज्जी दोघींनी खूप गप्पा मारल्या. आज्जी नं 'या सुखानो या', 'गोजीरवाण्या घरात' ची स्टोरी सांगितली ( मी लहान असताना आज्जी मला छान गोष्टि सांगत असे, आज काल मराठी सिरियल च्या स्टोरी सांगते.) आज्जी झोपल्यानंतर 'काय करायचं?' हा प्रश्न उभा. दुपारी झोपायची सवय नाहि. काय करायचं असा विचार करत घरभर फिरले. टळटळीत दुपार त्यामुळे बाहेर फिरयला जाणे नाहि, मग पुस्तक - ओहो आई नं लायब्ररीतून् आणलेली मासिकं झालियेत वाचून. 'काय करावे काहि सुचेना बाई' हि एका बडबड गीतातील ओळ म्हणत फिरत होते घरात. मला 'पुढारी' वाचयला आवडत नाहि, आणि 'लोकसत्ता' आणायला S.T. Stand पर्यंत कोण जाणार? जाऊ दे, असा विचार करत करत भावाच्या अभ्यासाच्या कपाटा जवळ आले, तिथे S/W engg, graphics हि पुस्तके, ती पण नको. MCA ला वाचली खूप झालं. तिथं मला सातवीत असणार्या माझ्या चुलत भावाचं मराठीचं पुस्तक सापडलं.
वाह ठिक आहे मराठीचं पुस्तक सही काहितरी वाचायला मिळलं. पुस्तक वाचताना मला माझा सहावी चा मराठीचा पेपर आठवला. पेपर मध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरील एक कविता होती आणि त्यावर पश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न चांगला लक्षात राहिला तो होता :

देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे
घेता घेता घेणार्याने, देणार्याचे हात घ्यावेत

या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
मग मी लिहुन आले देणार्याने देत रहावे घेणार्याने घेत रहावे आणि देणार्याचं सगळं देऊन संपलं तर घेणार्याने त्याचे हातच काढुन घ्यावेत. पेपर झाल्यावर घरी आले, आईनं विचारलं काय लिहिलंस या प्रश्नाचं उत्तर, मग झोपळ्यावर झुलत झुलत जे लिहिलं ते सांगितलं. आई हसली आणि जरासुद्धा न रागावता तीने मला पूर्ण कविता समजावून सांगितली. यावर माझा भाबडा प्रश्न असा होता, आई, हे लोक सरळ, सरळ का गं नाही सांगत, कि घेणार्यानं घेता घेता देणार्या सारखं द्यायला शिकावं.

तर सांगत होते एक आणि भरकटले दुसरीकडे. कुठे होते मी, हां तर सातवीचं पुस्तक वाचत होते. मी एक छान कविता वाचली. ती कविता मी सातवी मध्ये असताना सुद्धा वाचली होती, पण असं वाटलं की मला नव्याने ती कविता समजली.

रे तुझीया सामर्थ्याने ढळतील दिशा हि दाही,
मी फुल तृणातील इवले उमलणार तरीहि नाही

शक्तीने तुझीया दिपुनी, तुज करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे, ओठातील गाणे हसरे

जिंकिल मला दवबिंदु, जिंकिल तृणातील पाते,
अन स्वताःस विसरून वारा, जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला, श्रावणातल्या जळधारा
सळ्ऽसळून भिजली पाने, करतील मज सजल इशारा

रे तुझीया सामर्थ्याने, मी मला कसे विसरावे
रंगाचे अन्ऽ गंधाचे, मी गीत कसे गुंफावे

शोधीत धुक्यातूनी मजला, दवबिंदू होऊनी ये तु
जणु भिजलेल्या मातीचा, सजल सुगंधीत हेतू

तु तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे
तु हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे

या कवितेच्या कवींच नाव लक्षात नाहि राहिलं :( आता सातवीच्या पुस्तकात पाहून सांगते. मी सातवी मध्ये असताना या कवितेला 'हट्टी फुलाची कविता' असं म्हणायचे. कविता खुपच छान आहे. पण मला खरं सांगा, खरचं ही कविता सातवीच्या मुलांना समजण्यासारखी आहे का?