Saturday, August 30, 2008
तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस हि!!!!
अमृता : आज उशीर झाला?
मी : होय
अमृता : काय झालं मूड खराब आहे वाटतं?
मी : नाहि गं..
अमृता : ह्म्म..
मी : आधी ते गाणं बंद कर, थकुन घरी आल्यावर असली गाणी ऐकवू नको.
अमृता : का? मला आवडतं.
मी : काय तर गाणं, मला असली गद्य गाणी आवडत नाहित.
अमृता : मला आवडतात.
मी : मग मी कंपनी मध्ये गेल्यावर लाव!
अमृता : तुच जातेस का? मी नाहि का जात? मला पण office आहे.
मी : काय गाणं "मी कांदा झालो नाहि, आंबा हि झालो नाहि" , कसं गं तुला आवडतं?
अमृता : पसंद अपनी अपानी, खयाल अपना अपना. ताई पुढचं गाणं ऐक तुला पण खुप आवडेल.
मी : मी म्हटलं ना मला हि गाणी आवडत नाहित
अमृता : तु ना जुन्या जमान्यातली असल्या सारखी वागतीस बास झाले आता सुधीर फडके ऐकणं.
मी : यात जमाना कुठे आला? काहिहि बोलायच का? शब्द, चाल या मुळं मला त्यांची गाणी आवडतात. आल्या आल्या भांडु नको. या गाण्याला काहि अर्थ आहे का? तुच सांग.
अमृता : पुढचं गाणं ऐक त्यात तुला चाल, शब्द सगळं मिळेल, सरसकरट सगळ्याला नावं ठेउ नको.
मी : मी फ्रेश होउन येते, चालु दे तुमचं, ऐकु नको कधिहि.
.................
(ओ ओ हे गाणं ऐक म्हणत होती तर अमर.)
मी : ए ए हे कुठलं गाणं company मध्ये एका कलिग चा हा ring tone आहे.
अमृता : आता का?
मी : सांग ना, सांग ना...
अमृता : आता लाईट आल्यावर ऐक, छान गाणं आहे. "तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस हि"
मी : छान आहे!!!!!
अमृता : ऐकावं कधीतरी लहान बहिणीचं.
Wednesday, July 16, 2008
मालेगांव ची थिएटर्स
Disclaimer : पोस्ट पुर्णपणे ऍकिव माहितीवर आधारीत.
मी मालेगांव पाहिलं नाही. माझा एक सहकारी ( मला कलिग म्हणायच आहे) मालेगांव चा आहे. या आधीच्या कंपनी मध्ये तो आणि मी एका टिम मध्ये होतो. ती कंपनी हिंजवडी मध्ये असल्यामुळे आम्हाला अशा गप्पा मारायला cab मध्ये खुप वेळ मिळत असे. एकदा असाच मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स असा विषय निघाला आणि मालेगांव मध्ये थिएटर ला पिक्चर बघणे म्हणजे काय असतं हे त्यानं आम्हाला सांगितलं. चर्चा मल्टिप्लेक्स वरुन सुरु झाली. त्याच्याच शब्दात देण्याचा थोडा फार प्रयत्न.
"मालेगांव ला पिक्चर पहायचा म्हणजे एक मोठा एव्हेन्ट वाटायचा. कारण तिकिट काढण्यापासून trilling exp. ला सुरुवात. ती तिकिट खिडकी च्या समोरच्या जागेत (रांगेत जिथे सर्वात शेवटी जाळी असते ना तिथे) एक व्यक्ति आणि त्या तिकिट खिडकी च्या डाव्या बाजुने एक, आणि उजव्या बाजुने एक असे जाळी मधुन हात, आणि त्या जाळीवर चढुन तिकिट मागणारा एक हात. मग भांडणं होतात, मराठी आणि हिंदी भाषेतल्या शेलक्या शिव्या कानावर पडतात आणि मग तिकिट हातात पडतं. या नंतर तर मोठा गड सर करायचा तो म्हणजे जागा पकडायची. तिकिट घेऊन दरवाजा पर्यंत जाई पर्यंत तिथे गर्दि, आणि मग डोअरकिपर ग्रिल एक माणुस जाईल इतकं उघडतो. तिथे धक्काबुक्की (म्हणजे कधी कधी खरचं धक्का + बुक्की). मग तुम्ही कसे तरी थिएटर मध्ये शिरता. आत गेल्यानंतर तुम्हि रिकाम्या खुर्चीवर बसायला जाल, तर त्या रांगेच्या पहिल्या सीटवरून आवाज येइल "ए वहॉ मत बैठो, ये सब सीट पकडलीया है". रांगेच्या एका टोकाला तो माणुस आणि दुसर्या टोकाला चप्पल, रुमाल, टोपी तत्सम वस्तू तुम्हाला दिसेल. मग मुकाट्याने मागच्या रांगेत जाऊन बसलात कि समोरच्या रांगेतली व्यक्ति मोठ्याने आवाज देइल "ए रफिक, तौफिक इधर आव!!!!" अश्या तर्हेने सगळी स्थानापन्न होतात. थिएटर मध्ये काही समलमान खान चे fan शर्ट काढुन बसतात, संजय दत्त चे fan केस वाढवुन आलेले असतात. मग 'इस्माइल विडी' च्या निळ्या निळ्या धुरात आणि गुटख्या च्या वासामध्ये पिक्चर सुरु होतो. 'राज' मी असाच निळ्या निळ्या धुरात पाहिलाय, आधीच त्यात थोडा अंधार आहे. पिक्चर ला जाताना कायम रंगपंचमी ला खराब झालेले कपडे घालुन जायचो. पहिल्यांदा City Pride ला गेलो, आणि काय अरे बघतो तर लोक छान छान कपडे घालुन आलेले. आता पिक्चर सुरु झाला एखादा चांगला सीन असेल म्हणजे नाना पाटेकर नं नाना स्टाइल मध्ये एखादं भाषण ठोकलं तर थिएटर शिट्ट्यानी दणाणतं (City Pride ला टाळ्या पडतात). एखाद्या item song ला अजुनसुद्धा सुट्टे पैसे स्क्रिन वर फेकतात. काहि काहि थिएटर्स तर अशी आहेत, इंग्रजांच्या काळापासुनची जाळि आजहि तिथे लटकत आहेत."
थोड्या फार फरकानं माझ्या गावाला पण असच आहे.
Monday, April 14, 2008
मी फुल तृणातील इवले!!!
वाह ठिक आहे मराठीचं पुस्तक सही काहितरी वाचायला मिळलं. पुस्तक वाचताना मला माझा सहावी चा मराठीचा पेपर आठवला. पेपर मध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरील एक कविता होती आणि त्यावर पश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न चांगला लक्षात राहिला तो होता :
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे
घेता घेता घेणार्याने, देणार्याचे हात घ्यावेत
या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
मग मी लिहुन आले देणार्याने देत रहावे घेणार्याने घेत रहावे आणि देणार्याचं सगळं देऊन संपलं तर घेणार्याने त्याचे हातच काढुन घ्यावेत. पेपर झाल्यावर घरी आले, आईनं विचारलं काय लिहिलंस या प्रश्नाचं उत्तर, मग झोपळ्यावर झुलत झुलत जे लिहिलं ते सांगितलं. आई हसली आणि जरासुद्धा न रागावता तीने मला पूर्ण कविता समजावून सांगितली. यावर माझा भाबडा प्रश्न असा होता, आई, हे लोक सरळ, सरळ का गं नाही सांगत, कि घेणार्यानं घेता घेता देणार्या सारखं द्यायला शिकावं.
तर सांगत होते एक आणि भरकटले दुसरीकडे. कुठे होते मी, हां तर सातवीचं पुस्तक वाचत होते. मी एक छान कविता वाचली. ती कविता मी सातवी मध्ये असताना सुद्धा वाचली होती, पण असं वाटलं की मला नव्याने ती कविता समजली.
रे तुझीया सामर्थ्याने ढळतील दिशा हि दाही,
मी फुल तृणातील इवले उमलणार तरीहि नाही
शक्तीने तुझीया दिपुनी, तुज करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे, ओठातील गाणे हसरे
जिंकिल मला दवबिंदु, जिंकिल तृणातील पाते,
अन स्वताःस विसरून वारा, जोडील रेशमी नाते
कुरवाळीत येतील मजला, श्रावणातल्या जळधारा
सळ्ऽसळून भिजली पाने, करतील मज सजल इशारा
रे तुझीया सामर्थ्याने, मी मला कसे विसरावे
रंगाचे अन्ऽ गंधाचे, मी गीत कसे गुंफावे
शोधीत धुक्यातूनी मजला, दवबिंदू होऊनी ये तु
जणु भिजलेल्या मातीचा, सजल सुगंधीत हेतू
तु तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे
तु हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे
या कवितेच्या कवींच नाव लक्षात नाहि राहिलं :( आता सातवीच्या पुस्तकात पाहून सांगते. मी सातवी मध्ये असताना या कवितेला 'हट्टी फुलाची कविता' असं म्हणायचे. कविता खुपच छान आहे. पण मला खरं सांगा, खरचं ही कविता सातवीच्या मुलांना समजण्यासारखी आहे का?
Thursday, March 27, 2008
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे
घेता घेता घेणार्याने, देणार्याचे हात घ्यावेत
(मला हि कविता पुर्ण माहित नाहि, पण या दोन ओळि मात्र माहित आहेत. या दोन ओळि का लक्षात आहेत ते सांगेन.)
या प्रमाणे किमान १ वर्ष ब्लॉग वाचुन आता विचार केला, बघु आपल्याला जमेल का ब्लॉग लिहायला. ब्लॉग अशा साठी, माझे काहि अनुभव, भित्रे पणाचे किस्से, हॉस्टेल वर घडणर्या गमती जमती, NDA च्या आठवणी इथे लिहण्यासाठी.